Nagpur Accident News : बारावीच्या परीक्षेच्या दिवशीच दुर्दैवी घटना; नागपुरात विद्यार्थिनी व वडिलांचा अपघाती मृत्यू
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नागपुरातून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तन्वी भिवणकर या विद्यार्थिनीचा आणि तिचे वडील सुभाष भिवणकर यांचा जागीच मृत्यू झाला.
तन्वी परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. त्याचवेळी समोरून वेगात येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोघांचाही घटनास्थळीच अंत झाला. त्यांच्या सोबत असलेली आणखी एक तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात संताप उसळला. नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून मारहाण केली तसेच वाहनाची तोडफोड केली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतही बारावीच्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. भंडाऱ्यात तर एका विद्यार्थिनीने वडिलांच्या निधनाच्या दु:खातही परीक्षा दिल्याची घटना समोर आली. बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नागपुरातून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.
मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तन्वी भिवणकर या विद्यार्थिनीचा आणि तिचे वडील सुभाष भिवणकर यांचा जागीच मृत्यू झाला.
तन्वी परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती.

